प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगाची योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात तीन वेळा पैसे मिळतात. म्हणजे दरवेळी 2000 रुपये आणि एकूण वर्षाला 6000 रुपये मिळतात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.
या योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. 18 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी शहरात जाणार आहेत. तिथे ते पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता जाहीर करू शकतात, असं सांगितलं जात आहे.
या योजनेचा मागचा म्हणजे 19 वा हप्ता 24 फेब्रुवारीला आला होता. आता 4 महिने उलटून गेले आहेत आणि शेतकरी पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांचा हप्ता अजून आलेला नाही, म्हणून शेतकरी थोडे गोंधळात आहेत.
या योजनेत पैसे खालील पद्धतीनं दिले जातात:
- पहिला हप्ता: 1 एप्रिल ते 31 जुलै
- दुसरा हप्ता: 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर
- तिसरा हप्ता: 1 डिसेंबर ते 31 मार्च
म्हणून 31 जुलैच्या आत 20 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
ही योजना 2019 पासून सुरू झाली आहे. आजपर्यंत जवळपास 10 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा मिळाला आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मिळून एकूण 3.64 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.
मात्र, सगळ्यांनाच हा हप्ता मिळत नाही. फक्त तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात, ज्यांच्याकडे स्वतःची शेती आहे, ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे आणि ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे. डॉक्टर, इंजिनिअर, पेन्शनधारक, आणि आयकर भरणारे लोक या योजनेतून वगळले गेले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेशिवाय अजून एक योजना आहे – नमो शेतकरी महा सन्मान निधी. यातून देखील त्यांना वर्षाला 6000 रुपये मिळतात. त्यामुळे एकत्रितपणे त्यांना 12,000 रुपयांची मदत होते.
यंदाही पंतप्रधान मोदी मोठ्या कार्यक्रमात हप्ता जाहीर करतील. त्यानंतर काही दिवसांत पैसे हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. तांत्रिक अडचणीमुळे कधी कधी पैसे येण्यास 2 दिवस लागू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं बँक खाते आणि आधार कार्ड लिंक झालंय का हे तपासून पाहावं.
ही योजना लहान शेतकऱ्यांसाठी खूप मदतीची आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे पात्र शेतकरी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा. पुढे सरकार ही योजना अजून सोपी आणि पारदर्शक करणार आहे, असं सांगितलं आहे.